बाल न्याय अभियान कार्यशाळा बाबत

मुलांची काळजी व संरक्षण यासाठीच्या बाल न्याय अधिनियमासंदर्भात शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद कोल्हापूर व स्वाभिमानी बाल हक्क अभियान यांचेवतीने दि.०५/०७/२०१७ रोजी जुने सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विशेष कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मुलांचे हक्क आणि अधिकार या विषयी सर्व गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांना सविस्तर माहिती देणेत आली. मुलांच्या हक्काची जाणीव करुन देवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात नियमित करणेच्या व शाळाबाह्य विद्यार्थीविरहीत कोल्हापूर जिल्हा निर्माण करणेच्या उद्देशाने ही कार्यशाळा पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.कुणाल खेमनार, शिक्षण व अर्थ समिती सभापती मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.श्री.सुभाष चौगुले, अवनिच्या उपाध्यक्षा मा.श्रीम. अनुराधा भोसले यांचेसह शिक्षण विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री.सुभाष चौगुले यांनी समाजातील शेवटचा विद्यार्थी शाळेत आणण्यासाठी काम करणेचे तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देणेची गरज असलेचे स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.कुणाल खेमनार यांनी आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांना सुजाण नागरिक बनविण्यासाठी आत्तापासून प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागत नाही, मुले घरी सुरक्षित असतात असे गैरसमज दूर होवून पालक व समाज यांच्यामध्ये जाणीव जागृती करणेची गरज असलेचे सांगितले. शाळाबाह्य विद्यार्थीविरहीत कोल्हापूर जिल्हा निर्माण करण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करणेचे आवाहन केले. यावेळी शिक्षण व अर्थ समिती सभापती मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे यांनी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्नांव्दारे सर्व पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी व जिल्हा परिषदेच्या शाळा समृद्ध करणेसाठी सहकार्य करणेचे आवाहन केले.

बाल न्याय अधिनियमासंदर्भात अवनि संस्थेच्या उपाध्यक्षा मा.श्रीम.अनुराधा भोसले यांनी सविस्तर माहिती दिली. यामध्ये मुलांचे चार प्रकारचे अधिकार- जगण्याचा अधिकार, संरक्षणाचा अधिकार, विकासाचा अधिकार व सहभागितेचा अधिकार तसेच शोषण व त्याचे प्रकार याबाबत मार्गदर्शन केले. विविध चित्रफितींव्दारे शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाबाबत केलेल्या कार्याची माहिती दिली. जिल्हा नियोजन समिती व शिक्षण विभागाच्या सहकार्यामुळे वीटभट्टीवरील मुलांच्या शिक्षणासाठी वाहतूक व्यवस्थेव्दारे नियमित उपस्थिती राखता आलेबाबत समाधान व्यक्त केले.

आभार उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री.बी.एम.कासार यांनी मांडले.

सदरची कार्यशाळा यशस्वी होणेकरिता श्री.डी.डी.कुंभार, श्री.बी.बी.पाटील, श्रीम.जे.एस.जाधव, श्री.व्ही.एस.वर्मा, श्री.आर.एम.धनवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

                                                                                                                                                शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                                                                जिल्हापरिषदकोल्हापूर

Leave a Comment