शालेय विद्यार्थ्यांच्या शीघ्र निदानासाठी कार्यशाळेचे आयोजन

सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत दरवर्षी ० ते १८ वयोगटातील बालकांची शालेय आरोग्य तपासणी करणेत येते.    शालेय आरोग्य तपासणीमध्ये शाळास्तरावर उपचार होवू न शकलेल्या बालकांना तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी तसेच त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडे संदर्भिय सेवेसाठी संदर्भित केले जाते. जिल्हा शल्यचिकित्सकांनी शिफारस केलेल्या बालकांवर सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विविध शासकीय तसेच शासन मान्य रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया केली जाते. दिव्यांग बालकांना गरजेनुरुप दृष्टी मूल्यमापन, श्रवण मूल्यमापन, मानसशास्त्रीय मूल्यमापन, साहित्य व साधने, मदतनीस व प्रवासभत्ता, ब्रेलबुक व लार्ज प्रिंटबुक अशा सुविधाही सर्व शिक्षा अभियानामधून पुरविणेत येतात.

सन २०१६-१७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४,६६,५३५ बालकांची मार्च २०१७ अखेर शालेय आरोग्य तपासणीच्या पथकामार्फत आरोग्य तपासणी झालेली आहे. या तपासणीमध्ये जिल्ह्यातील ६७,५२५ विद्यार्थ्यांना किरकोळ शारिरीक व्याधी आढळून आली असून ती प्राथमिक उपचाराने बरी करण्यात यश आलेले आहे.

सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये ० ते १८ या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व आजाराचे निदान लवकरात-लवकर होवून योग्य उपचार वेळीच होणेसाठी जिल्हातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकडील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा दि.१४ जून २०१७ रोजी राजर्षि शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर कार्यशाळेला क्षयरोग तज्ञ डॉ.यु.जी. कुंभार, कुष्टरोग तज्ञ डॉ.शित्तू जमखानी / डॉ.हर्षदा वेदक, हृदयरोग तज्ञ डॉ.अर्जुन आडनाईक, दंतचिकित्सक तज्ञ डॉ.रमेश पोरवाल, नेत्ररोग तज्ञ डॉ.अजेटराव, कान, नाक, घसा तज्ञ डॉ.वाडकर,  बालरोग तज्ञ डॉ.थोरात, राजीव गांधी जीवनदायी योजनाडॉ.सागर पाटील  हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननिय पदाधिकारी उपस्थित राहणार असून सर्व वैद्यकीय अधिकारी, शिक्षण व आरोग्य विभागाकडील सर्व अधिकारी यांचेसह स्थानिक वृत्तपत्रांचे  वार्ताहर यांना उपस्थित राहणेबाबत आवाहन करणेत येत आहे.

 

 

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर

Leave a Comment