किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम

 

 

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आज किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय प्रशिक्षणाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. वैयक्तिक स्वच्छतेमधील अतिशय महत्वाचा मानला जाणार विषय हा शालेय मुलींपर्यंत पोहचविणे तसेच या विषयाबाबत शास्त्रशुध्द माहिती मुलींना मिळावी. त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मासिक पाळी व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविला जात आहे.

या कार्यक्रमांतर्गत आज जिल्हा परिषदेमध्ये प्रविण प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, मा. सौ. शौमिका महाडीक, उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, जि. प. कोल्हापूर, महिला व बालकल्याण सभापती मा. सौ. वंदना मगदूम, मा. सौ. स्वरूपाराणी जाधव, मा.सौ. विजया पाटील जि. प. सदस्य  यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून युनिसेफच्या प्रतिनिधी मा. श्रीम. अपर्णा कुलकर्णी तसेच जिल्हा परिषद सांगली येथील प्रविण प्रशिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी उपस्थिातांचे स्वागत आणि  प्रास्ताविक मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे,उप मु का अ(पा.व स्व.) यांनी केले व प्रशिक्षणाचा उदद्ेश सांगितला. मासिक पाळी हा विषय अद्याप ही रूढी, परंपरा आणि अंधश्रध्दा यामध्ये बंद आहे.समाजाचा या विषयाबाबतचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे सांगून या प्रशिक्षणासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी चांगल्या पध्दतीचे प्रशिक्षण घेवून हा विषय मुलींपर्यंत पोहोचवावा असे मा.अध्यक्ष, जि.प. कोल्हापूर यांनी सांगितले. तर युनिसेफच्या प्रतिनिधी मा. श्रीम. अपर्णा कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. हा विषय अतिशय नाजूक असून या विषयाबाबत मुलींना प्रशिक्षण देताना त्यांना वेगवेगळया खेळांच्या आणि चर्चासत्राच्या माध्यमातून सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा परिषद सांगली येथील प्रविण प्रशिक्षकांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले.

सदर प्रशिक्षण हे दोन दिवसांचे असून यामध्ये तालुकास्तरावरून शिक्षिका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. हे  प्रविण प्रशिक्षक तालुकास्तरावरील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील आणि ते प्रशिक्षक प्रत्यक्ष शाळांमध्ये मुलींना प्रशिक्षण देतील असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. प्रशिक्षणादरम्यान मासिक पाळीबाबत माहिती पुस्तिका, हॅन्डबुक आणि लॅमिनेटेड चार्ट असे प्रशिक्षण साहित्य वाटप करण्यात आले.

 

प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आभार मा.श्री. सोमनाथ रसाळ,उप मु का.अ (म.बा.क) यांनी मानले. प्रशिक्षणाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले होते.

Leave a Comment