कोल्हापूर दि ३ – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी जिल्हयात डीजीटल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
आज सोमवार दिनांक ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या परिसरात डिजिटल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मा. अध्यक्ष, सौ. शौमिका महाडीक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती मा. श्री. सर्जेराव पाटील, समाज कल्याण सभापती मा. श्री. विषांत महापुरे, जेष्ठ जि.प. सदस्य मा. श्री. अरूण इंगवले, श्री.विजय भोजे, श्री. हेंमंत कोलेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व. ) प्रियदर्शिनी मोरे, सर्व विभागाचे खातेप्रमुख तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षचे तज्ञ व सल्लागार आदींची उपस्थिती होती. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने ही व्हॅन कोल्हापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे.
ही व्हॅन जिल्ह्यातील १५० गावात जाणार आहे, डिजिटल व्हॅनद्वारे ग्राम पंचायत, शाळा, अंगणवाडी आणि महिला बचत गट यांना स्वच्छतेविषयक फिल्म दाखवण्यात येणार आहे.
राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे वतीने मुंबई येथील आर.डब्ल्यु प्रमोशन संस्थेच्यावतीने आज पासून जिल्ह्यातील १५० ग्रामपंचायती मध्ये ही व्हँन फिरणार आहे.
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने ही मोहिम आखण्यात आली आहे. शाश्वत स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, मेला गाळ व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, गटार मुक्त व शौषखड्डेयुक्त गाव अभियानाची माहिती या डिजीटल व्हॅनद्वारे ग्रामस्थांना दाखवण्यात येणार आहे.