आर.टी.ई. 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2020-21 अंतर्गत प्रवेश फेरी सुरू

आर.टी.ई. 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2020-21 अंतर्गत प्रवेश फेरी सुरू

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारअधिनियम 2009 मधील कलम (12)(1)(सी) अन्वये खाजगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 % जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या अंतर्गत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https:// student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे.

सदर प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील 345 शाळांमधील 3486 जागांसाठी एकूण 2996 पालकांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. तसेच राज्य स्तरावर दि. 17/03/2020 रोजी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आलेली आहे. लॉटरीद्वारे 2388 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच 608 विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे कामकाज झालेले नाही. सद्यस्थितीत पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर कागदपत्रांची पडताळणी करून व संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात यावेत. याबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.-

शाळेने करावयाची कार्यवाही –

  • शाळेला RTE पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिलेले आहेत. या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावयाचे आहे, ती तारीख शाळेने टाकावी. त्याप्रमाणे पालकांना SMS जातील.
  • प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर अथवा योग्य त्या ठिकाणी लावण्यात यावे.
  • शाळेत आल्यानंतर पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकीत प्रत प्राप्त करून घ्यावी. कागदपत्रांची तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्याच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी. तसेच पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व अलॉटमेंट लेटर पालकांना परत करावे. तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे. हमीपत्राचा नमुना म.न.पा. शिक्षण विभागात अथवा तालुका पंचायत समिती शिक्षण विभागात उपलब्ध केलेला आहे. सदर नमुना शाळांनी प्राप्त करून घ्यावा व पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे.
  • दिलेल्या तारखेस पालक आले नाहीत तर त्यांना पुन्हा पुढील तारीख देण्यात यावी. तसा SMS त्यांना जाईल. दुस-यांदा दिलेल्या तारखेस उपस्थित न राहील्यास तिस-यांदा तारीख देण्यात यावी. अशा प्रकारे पालकांना तीन वेळा संधी द्यावी.
  • शाळेने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर अशा तात्पुरत्या प्रवेशित बालकांना लाभ देण्यात यावा. शाळा जेव्हा प्रत्यक्षात सुरू होईल तेव्हा या बालकांना प्रवेशित झाले असे समजून वर्गात बसण्याची मुभा द्यावी.
  • शाळेने पडताळणी समितीची दिनांक व वेळ घेऊन पालकांकडून संकलित केलेली सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे घेऊन जावीत व पडताळणी समितीकडून प्रवेश निश्चित करावेत.
  • शाळेने प्रतिक्षा यादीतील पालकांना सध्या बोलावू नये. त्याबाबत स्वतंत्र सुचना देण्यात येतील.
  • कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील पालकांना निर्बंध शिथिल झाल्यांनतर बोलाविण्यात यावे.
  • शाळा कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात असल्यास अथवा अन्य कामासाठी प्रशासनाने ताब्यात घेतली असल्यास अशा शाळांनी प्रतिबंधित क्षेत्रातील अटी शिथिल झाल्यानंतर प्रवेशाबाबत कार्यवाही करावी.

पालकांनी करावयाची कार्यवाही –

  • शाळेचा प्रवेशाबाबत मेसेज आल्यानंतर त्या दिनांकास सर्व मूळ आवश्यक कागदपत्रे व एक छायांकीत प्रत घेऊन शाळेत उपस्थित रहावे व कागदपत्रांच्या पडताळणीस अधिन राहून तात्पुरता प्रवेश घ्यावा. तसेच हमीपत्र शाळेला द्यावे.
  • शाळेने दिलेल्या दिनांकास उपस्थित राहता येणे शक्य नसल्यास शाळेला तसे कळविण्यात यावे व पुढील दिनांकाची मागणी करावी.
  • शाळेच्या मेसेजवर अवलंबून न राहता RTE पोर्टलवर बालकाचा अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या दिनांकाची खात्री करावी.
  • RTE पोर्टलवर पालकांसाठी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
  • पडताळणी समितीस कागदपत्रे चुकीची आढळून आल्यास व RTE पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास हमीपत्रातील अटींप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

पडताळणी समितीने करावयाची कार्यवाही –

  • आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांवर प्रवेशाबाबत देखरेख करावी. शाळा या पत्रातील सुचनेप्रमाणे कार्यवाही करीत आहेत याची खात्री करावी. शाळांना व पालकांना मार्गदर्शन करावे. तसेच प्रसिध्दीही द्यावी.
  • प्रत्येक शाळेला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिनांक व वेळ देण्यात यावी.
  • कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावेत. तशी नोंद ऑनलाईन पोर्टलवर करावी.
  • पडताळणी मध्ये कागदपत्रे चुकीची आढळून आल्यास किंवा पालकांनी पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश रद्द करणे / फौजदारी कार्यवाही करणे / शासकीय प्रतिपूर्तीस बालकास अपात्र करणे व त्यामुळे पालकाने शाळेची पूर्ण फी भरणे यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त शिक्षा प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन करण्यात यावे.

वरीलप्रमाणे पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून दिलेल्या दिनांकास शाळेकडून कागदपत्रे तपासून शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.

 

 

 

(श्रीम. आशा उबाळे)

                                                                                शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                                 जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

Leave a Comment